डोंबरजवळगे (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथे सनश्योयर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड व सहयोगी कंपनीच्या सौर प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीने नियमांना हरताळ फासल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकल्पाच्या कामामुळेच आता शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून मोठे नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पाटबंधारे आणि शेती बांध लेव्हल करताना नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पूर्णपणे बदलण्यात आला. वरच्या भागातील माती मोठ्या प्रमाणात उचलल्यामुळे पाण्याचा वेग वाढला आणि ते थेट खालच्या शेतांमध्ये घुसू लागले. परिणामी सुपीक माती वाहून जात असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
याबाबत 21 जुलै 2025 रोजी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र, आजतागायत कोणतीही ठोस कारवाई किंवा पाहणी करण्यात आलेली नाही. “आधी सांगितलं नव्हतं” असे म्हणण्याची वेळ येऊ नये म्हणून वारंवार विनंती करूनही प्रशासनाकडून पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात गंभीर अनियमितता उघड होत आहेत. हाती लागलेल्या पुराव्यानुसार, विदेशात असलेल्या ग्रामस्थांच्या सह्या ग्रामसभेत दाखवल्या गेल्याचा आरोप आहे. तसेच, माहिती अधिकारात माहिती देताना तब्बल सहा महिन्यांनंतर सह्या घेण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे.
याशिवाय, नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आल्याने नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थ वारंवार ग्रामसभा घेण्याची मागणी करत असतानाही ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ केली जात असल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.
“गावकऱ्यांच्या नकळत निर्णय, बनावट कागदपत्रे आणि थेट शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला कारभार—हे नेमकं चाललंय तरी काय?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
संतप्त ग्रामस्थांनी आता या संपूर्ण प्रकरणाची मंत्रालयीन चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे. पदाचा गैरवापर करून नियमबाह्य कारभार केल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
जर तात्काळ दखल घेतली नाही, तर हे प्रकरण चव्हाट्यावर आणून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.