दुबई / मुंबई | ६ ऑगस्ट २०२५
भारतीय पायाभूत क्षेत्रातील शक्तिशाली उद्योजक गौतम अदानी यांनी अदानी पोर्ट्स अॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) या देशातील सर्वात मोठ्या खाजगी बंदर कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ५ ऑगस्टपासून ते “नॉन-एग्झिक्युटिव्ह चेअरमन” म्हणून कार्यरत राहतील, अशी माहिती कंपनीने जाहीर केली.
हा निर्णय अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये सुरू असलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचे दिसते. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, अदानी समूहाने बंदी असलेल्या ईराणमधून LPG (गॅस) आयात केल्याचा संशय असून, ही आयात मुंद्रा पोर्टमार्फत झाल्याची शक्यता आहे.
तसेच, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानुसार अदानी समूहाने अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक करून निधी मिळवला, भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिली आणि $२५० मिलियन डॉलर्सच्या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या SEC व फेडरल अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे.
हा राजीनामा केवळ औपचारिक आहे की धोरणात्मक बचाव, यावर अद्याप स्पष्टता नाही. मात्र, अदानी समूहावर येणारे आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारतातील धोरणात्मक पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.