पुणे (प्रतिनिधी) – “क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे पुरस्कार मला मिळालेल्या राष्ट्रीय युवा पुरस्कारापेक्षाही मोठा वाटतो,” अशा शब्दांत आमदार अमित गोरखे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांना यंदाचा प्रतिष्ठेचा लहुजी वस्ताद साळवे पुरस्कार बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला.
क्रांतीवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित “हिंदू मागासवर्गीय विद्यार्थी गौरव समारंभ” उत्साही वातावरणात पार पडला. मागासवर्गीय समाजातील १०वी व १२वीमध्ये उच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात आमदार मा. अमित गोरखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दरवर्षी मागासवर्गीय समाजातील उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा “क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे पुरस्कार” यंदा आ. अमित गोरखे यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ तसेच लहुजी वस्ताद साळवे यांनी त्यांच्या जीवनात वापरलेल्या चांदीच्या कड्याच्या प्रतीकात्मक रूपात प्रत्यक्ष चांदीचा कडा देण्यात आला. हा कडा लहुजी वस्ताद यांच्या संघर्षमय व प्रेरणादायी जीवनाचे प्रतीक मानले जाते.
पुरस्कार वितरण ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. सुधाकर जाधवर, मिलिंद एकबोटे यांच्या शुभहस्ते झाले. आ. अमित गोरखे यांच्या सामाजिक न्याय, शैक्षणिक प्रोत्साहन, मागासवर्गीय समाजासाठी केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली.
या वेळी मार्गदर्शन करताना आ. अमित गोरखे म्हणाले, “तुमचे गुण केवळ तुमचे यश घडवत नाहीत, तर समाजालाही नवी दिशा देतात. शिक्षण हीच खरी क्रांती आहे. हा सन्मान तुम्हाला पुढील शिक्षणासाठी प्रेरणा देईल.”
कार्यक्रमाला डॉ. सुधाकर जाधवर, श्री. समीर कुलकर्णी, श्री. मिलिंद एकबोटे, श्री. योगेश ठिपसे, किसनराव जाधव, यशस्वी उद्योजक योगेश देशपांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.