ग्रामपंचायत शेवाळेवाडी महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून येथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही. मूलभूत सुविधांसाठी नागरिकांची ससेहोलपट होताना दिसत आहे . सध्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. महापालिकेकडून नागरिकांसाठी टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु पाणी वाटपामध्ये महापालिकेचा गलथान कारभार दिसून येत आहे . पाणी वाटप करताना यामध्ये प्रचंड अनियमितता आढळून येत आहे . पाण्यासाठी नागरिकांना पालिका कर्मचारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करावा लागत आहे. 1 मिनिट फक्त पाणी मिळत आहे ते देखील दिवसाआड. त्यामुळे नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात प्रचंड रोष दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांचे निकटवर्तीय तुपाशी व सामान्य जनता उपाशी असा काहीसा प्रकार या भागामध्ये दिसून येत आहे . पालिका प्रशासनाकडून कोणताही जबाबदार अधिकारी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत नाही किंवा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
त्याचप्रमाणे कोणत्याही राजकीय पक्षाकडून यावर ठोस भूमिका घेतली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. 5 घरांना एक टँकर याप्रमाणे नियोजन केलेले असून देखील कर्मचारी परस्पर दुसरीकडे टँकर देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे . सदर समस्या सोडविण्यासाठी आता नागरिक स्वतः पुढाकार घेऊन आयुक्तांना पत्र देऊन हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारणार असल्याचे संकेत स्थानिक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधताना दिले