VOICE OF INDEPENDENT MEDIA

 विश्लेषण
The Independent Voice

काय मरतो का शेतकरी एवढ्यानं..

अज्ञात    02-09-2024 11:40:24   276

शेतकरी ! 😢

तलाठ्याला वाटतं फेरफार साठी शेतकर्याने 30-40 हजार रूपये द्यावे कारण पाच एकर जमीन हाय ना. काय मरतो का शेतकरी एवढ्यानं..

बँक मॅनेजर ला वाटते शेतकर्‍याने लाखाच्या कर्जाला किमान १०हजार रूपये दलाला कडे जमा करावे. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

सोसायटी चेअरमनला वाटतं मीच शेतकऱ्यांला कर्ज वाटप करतो तेव्हा मी लाखामागं १५-२० हजार काढुन घेतलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

दुधडेअरी चेअरमनला वाटतं दुधाचा पगार आपणच करतो मग लिटरमागं चार रुपये ढापलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

दुधसंघाला वाटतं शेतकऱ्यांपेक्षा आपली मेहनत जास्त कारण बाळाला आत जाऊन टँकर धुवा लागतो ना... मग करा दुधाची फॅट कमी, काढा लिटरमागं ५ रुपये भाव कमी. मरतो का शेतकरी एवढ्यानं......

 म्हणजे झाला दुधसंघ करोडोपती आणि लागला पठारावरच्या ईलेक्शन जिंकु.

व्याजानं पैसं देणारा सगळं सोनं-नाणं तर हडप करतोच आणि शेतीलाही गिर्‍हाईक शोधतो एवढ्यावरच त्याचं भागत नाही तर शेतकऱ्याच्या चिमुरडीलाही चिरडण्याचा प्रयत्न करतो. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

भाजीमार्केट दलालांना वाटतं शेतकऱ्यांची पट्टी कधी देऊचं नाही आणि सगळा पैसा घशात घालावा. मरतो का शेतकरी एवढ्यानं......

साखरसम्राट यांना वाटतं प्रत्येक 10 टन ऊसा मागे 1 ते 2 टन काटा मारू, ऊसाचे बिल 6-6 महिने द्यायचं नाही,,, मरतो का शेतकरी एवढ्यानं......

लाईन वाल्या साहेबाला वाटते शेतकऱ्याने विजबिल पूर्ण भरावं आणि डीपी मेंटनस निघाला तर सर्व शेतकऱ्यांनी लाख रूपये जमा करून आपल्याकडे द्यावे आणी ते आपण मोठ्या साहेबाला पकडून अर्धे अर्धे खिशात घालावे. वर दिवाळीलापण घरोघरी उकळतोच. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

गावगुंडाला वाटतं आपल्यालाही मोकळ्यामोकळ्या १०- १५ हजार मिळवायचे असेल तर करा त्या शेतकऱ्याचा शेतीचा रस्ता बंद, करा खोटानाटा आरोप आणि उकळा पाहिजे तेवढे पैसे. मरतो का शेतकरी एवढ्यानं

कृषी विभागातील साहेबांना वाटते शेतकऱ्यांसाठी आलेल्या योजना म्हणजे आपल्या बापाच्याचं आहेत, त्या विकुनचं खाव्यात. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

खत-बियाने दुकानदाराला वाटते बोगस खत-बोगस बियाने शेतकऱ्याला कधी नगदी तर कधी उधार देवुन आपण आपला नफा करून घ्या. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

शेतमजुर तर मजुरी देवुन वर दारू ची मागणी करतंय. शेतातला भाजीपाला पाहिजे तेव्हढा नेतायं आनं नाही म्हणलं तर निघाला काम सोडुन. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

शहरातल्या लोकांना वाटतं शेतमाल भाजीपाला १०० रूपयात वर्षभर पुरेल एव्हढा द्यावा. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

टी व्ही चॅनल वाल्यांना वाटतं जे शेतकरी म्हणेल *"शेतीत दहा लाख उरते"* अशाच शेतकऱ्यांची मुलाखत दाखव.. आणि उकळावं लाखभर; मरतो का शेतकरी एवढ्यानं..

विरोधी पक्षाला वाटते आपली सत्ता आनायची असेल तर शेतकरीच महत्वाचा..

आणि सरकारला वाटते शेतकरी हीच देशाची खरी समस्या आहे म्हणून शेतकरी कमी झाला की देशातील सर्व समस्या संपतील म्हणून पहीले यांना संपवा देश आपोआप सुधारेल...

टीप :-..... अजुन कुणाचे काही राहीले असतील तर हिसाब न देता काढुन घ्या, कारण मी शेतकरीराजा आहे आणि माझा देश कृषीप्रधान आहे....मीच राजा आणि मीच प्रधान.. मग दोष कुणाला...?

 

दुर्दैवाने मात्र हे सत्य आहे.....

 

--- अज्ञात 


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.





 जाहिराती