चाकण : अचानक अवकाळी पावसाने चाकण परिसरात हजेरी लावली अर्धा तास न थांबता जोरात पाऊस चाकण व परिसरामध्ये बरसला यामुळे पठारवाडी येथील ओड्याला मोठ्या प्रमाणात पूर आला. ह्या पुराचे पाणी हे चाकण नगरपरिषद हद्दीतील असून यामध्ये चाकण शहरांमध्ये होणारे विविध प्रकारचे प्रदूषण यामुळे पाण्याचा रंग काळा कुट्ट असून हे विशिष्ट फेस युक्त पाणी आहे. हेच पाणी पुढे पठारवाडी, आगरवाडी तसेच राक्षेवाडी येथील शेतकरी शेतासाठी वापरत असून शेतीला हे पाणी अपाय कारक आहे. या पाण्यामुळे या परिसरातील जमीन नापिक होत चालली असून उत्पादनक्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पाण्याशी संपर्क येणाऱ्या माणसाला त्वचारोग उद्भवतात. हे पाणी पिल्याने या परिसरातील काही पाळीव प्राणी दगावल्याचेही निदर्शनात आले आहे. तसेच हे पाणी पुढे भामा नदीत जात असून नदीतील जलचर जीवजंतू साठी ही हानिकारक आहे. या विषयाचा गांभीर्याने विचार करत नगरपरिषद प्रशासनाने पाणी शुद्धीकरणासाठी योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे असा सूर येथील नागरिकांमध्ये उमटत आहे.