राजगुरूनगर : येथील हुतात्मा स्मृती स्मारक येथे शहीद चंद्रशेखर आझाद यांना ९१ व्या पुण्यतिथीनिमित्त क्रांतीवीर शिवराम हरी राजगुरु मेमोरीयल ट्रस्ट, खेड तालुका पत्रकार संघ, हुतात्मा राजगुरु स्मारक समिती व हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख विजयाताई शिंदे, राजगुरु मेमोरीयल ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल पाचारणे,खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र शिंदे, सचिव किरण खुडे, तुषार मोढवे, राजगुरु सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा अॅङ मनिषा टाकळकर, अॅड. सुनिल वाळुंज, राजगुरु स्मारक समितीचे बाळासाहेब वाईकर, व्यापारी महासंघाचे नितिन शहा आदींनी यांनी शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार व हुतात्मा राजगुरु, भगतसिंग व सुखदेव यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी मधुकर गिलबिले,पत्रकार बाळासाहेब सांडभोर, नाजिम इनामदार, रोहीदास गाडगे, सुनिल थिगळे, सदाशिव अमराळे, नितिन वरकड आदींसह हुतात्माप्रेमी नागरीक उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना विठ्ठल पाचारणे म्हणाले, ‘चंद्रशेखर आजाद हे क्रांतिकारकांचे आदर्श होते. न्यायालयामध्ये निडर भाषेत स्वतःचे नाव आझाद म्हणून सांगणारा हे क्रांतिकारक स्वतःच्या हयातीत ब्रिटिशांच्या हाती जीवंतपणे सापडले नाही. त्यांचे कार्य मोलाचे असून देशवासीयांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा.’ याप्रसंगी विजयाताई शिंदे, बाबाजी काळे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक मधुकर गिलबिले यांनी केले, तर सूत्रसंचालन कैलास दुधाळे यांनी केले.