चाकण : चाकण नगरपालिकेचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.याबाबत निवडणूक आयोगाने एक महिन्यात चाकण पालिकेला प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत.चाकण पालिकेची निवडणूक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे इच्छुकांना आगामी निवडणूकीचे वेध लागले आहे.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अजूनही न्यायालयात प्रलंबित असताना ही निवडणूक आयोगाने पालिकेची प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत.प्रभाग रचना निश्चितीनंतर आचारसंहिता व निवडणूक प्रक्रियासाठी ४५ दिवसांचा अवधी दिला जातो.चाकण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे दोन मार्च पर्यंत सादर करावा.नगरपरिषदेच्या प्रभागांची संख्या,त्यांची प्रभाग निहाय व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातींची २०११ च्या जनगणेंनुसार लोकसंख्या, क्षेत्र,सीमांकन व नकाशा आदींचा यामध्ये समावेश आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सात मार्चला या प्रस्तावाला मान्यता देणार आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी दहा मार्च पर्यंत प्रारूप प्रभाग रचना,प्रभाग दर्शक नकाशे नागरिकांच्या माहितीसाठी स्थानिक पातळीवर वर्तमानपत्र किंवा संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे.असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
१० ते १७ मार्च पर्यंत सूचना व हरकती मागविण्याचा कालावधी असेल.जिल्हाधिकारी २२ मार्च पर्यंत या हरकतींवर सुनावणी घेणार आहे.या नंतर याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयुक्तांना २५ मार्च पर्यंत सादर करावयाचा आहे.या सर्व प्रक्रियेनंतर एक एप्रिल रोजी निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देणार आहे.या कार्यक्रमानंतर अवघ्या एक महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चाकण पालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
* चाकण पालिकेत एकूण १२ प्रभाग असणार आहेत.यामध्ये २ सदस्य संख्या असलेले ११ प्रभाग तर ३ सदस्य संख्या असलेले १ प्रभाग असेल.पालिकेतील एकूण २५ सदस्य संख्या असणार आहे.२०११ जनगणानेनुसार प्रभाग रचना करण्यात येणार आहे.