चाकण : येथील एमआयडीसीमधील एका कंपनीत एचआर म्हणून नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्याने बनावट ई-मेल आयडी बनवून एका प्रतिष्ठित कंपनीतील मनुष्यबळ विकास अधिकारी व त्यांचेशी संबंधित असणाऱ्या व्हायब्रंट एच.आर. पुणे या संघटनेची बदनामी केल्याप्रकरणी दोन जणांना महाळुंगे पोलिसांकडून अटक केली आहे.
याप्रकरणी मनुष्यबळ विकास अधिकारी संतोष पांडुरंग चव्हाण आणि त्याचा साथीदार शैलेश नरहरी जाधव यांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे चाकण औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीमध्ये एच आर विभाग प्रमुख म्हणून कामास असून,संतोष चव्हाण सध्या लियर या कंपनीत एच आर विभागात कामास आहे.संतोष हा पूर्वी फिर्यादीच्या कंपनीत एच आर विभागात कामाला होता,सदर कंपनीचे एच आर विभाग प्रमुख सोडून गेल्यामुळे रिक्त झालेले पद व्यस्थापनाने फिर्यादीला दिले, हे संतोष चव्हाण याला कळताच आठ महिन्यापूर्वी एक बनावट ई-मेल आयडी बनवून त्याद्वारे फिर्यादी व त्याचे विभागातील दोन सहकारी तसेच त्याचे संबंधित असलेल्या व्हायब्रण्ट एच आर पुणे या संघटने विषयी बदनामीकारक आणि खोटी माहिती कंपनीतील व्यवस्थापनास अनेक वेळा मेल द्वारे पाठवून दिली.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरून आयपीसी कलम ५००, ५०९ आणि आय टी ऍक्ट कलम ६७ नुसार गुन्हा नोंदविणेत आला.प्रकरणाची चौकशीत बनावट ई-मेल आयडी बनविण्यासाठी संतोष चव्हाण यांचा लॅपटॉप वापरला गेल्याचे निष्पन्न झाले असून सदर लॅपटॉप जप्त केला आहे.
पुढील तपास महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गुळीग करित आहे.